Tuesday, 7 February 2017

आई रमाई तुला वंदन

हे रणरागिनी,
तुला वाचताना डोळ्यात अश्रू का यावे?
कदाचित तू केलेल्या त्यागाचे हे प्रतिक असावे,
अर्धपोटी राहून नांदली सोबत युगसूर्याच्या
करोडोंच्या डोक्यावर सावली तुझ्या पदराची,
फाटकीच साडी गळ्यात काळा मणी
रात्र रात्र तुझ्या दोन डोळ्यात त्यागाचे पाणी..
खर सांगतो आई वाचतो जेव्हा रमाई नावाची बाई
तुझी एक एक पहेली वाटे अवघड,
दादर ते वरळी सरपणासाठी चाललेली पायपीट
तू मात्र दिवस रात्र साहेबांच्या यशाची भुकेली,
रमेश जातो
गंगाधर जातो
इंदू जाते
राजरत्न गेला एका पाठोपाठ
पण डोळे पुसून तू मात्र करोडो लेकरांसाठी एकनिष्ठ..
साहेब म्हणजे तुझे विश्व
साहेब म्हणजे तुझा आनंद
साहेब म्हणजे तुझं आभाळ,
शेणाच्या गोवर्या ज्या हातांनी थापल्या
त्याच हातांनी स्वतःच्या इच्छा कापल्या करपल्या..
तू अंथरुणाला खीळते
हाथपायाचा थरकाप होतांना
पोलदासारखा बाबा तुला वेळ देत नाही
तो भटकत होता तुझ्या चील्यापिल्यांच्या
तोंडात पानी शिंपडन्यासाठी
तुझ्या वासरांच्या हक्कांसाठी वणवन..
तुला पंढरपूर बघायचे होते ना?
रामू तुझी हि इच्छा साहेब कसे टाळतील ग?
बघ त्या नागपुरात निर्मिले समतेचे पंढरपूर
विसावण्या येतात थवेच्या थवे,
एक मात्र खर तुला वाचतांना डोळे भरून यावे
जणू पावसात काळे काळे ढग यावे
तुझ्या प्रत्येक अश्रुच मोबदला मला द्यायचाय
सांग ना रमाई उपकार तुझे कसे फेडू
हा गोतावळा तुझ्या साठी आज व्याकूळ झालाय
लेकराला माय अन मायला लेकरू धरवाना..
हे माऊली,
तुला वाचताना डोळ्यात अश्रू का यावे?
कदाचित तू केलेल्या त्यागाचे हे प्रतिक असावे…

No comments:

Post a Comment