Tuesday, 7 February 2017

एका पत्नीचं मन

*खरचं का रे तुला …….?*

खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ? की माझ्या मनापर्यंत पोहचण्याइतका वेळचं तुला मिळत नाही ?

सकाळी उठताच तुझ्या हाती वृत्तपत्र असतं, मला मात्र किचन मधलं कामचं आधी दिसतं

हातात टीव्हीचा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो
मला मात्र सगळं आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो

सकाळच्या या गडबडीत कधीकधी मला कपभर चहाही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?

संध्याकाळी तू ऑफिस मधून दमून घरी येतोस, मलाही तुझ्या सारखच दिवसभर काम असत हे मात्र तू  अगदी साफ विसरतोस.

रात्रीचा स्वयंपाक, सकाळची तयारी माझी नुसती धावपळ सुरु असते, स्वतःबद्दलही विचार करायला ही मला फुरसत कुठे असते ?

तक्रार नाही रे, पण सगळ मँनेज करताना मला पुरेशी झोपही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?

सुट्टीचा दिवस म्हणजे तुझ्या हक्काच्या विश्रांतीचा दिवस
असतो, मला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो.

त्यातचं पाहुणे, मित्र यांच येणं , तुझ्यासाठी गेट-टुगेदरची मजा असते, माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही ओवर टाईमची सजा असते

मला कधीच का हक्काची सुट्टी किंवा एखादी रजाही मिळत नाही खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?

तू खूप काही मदत करावीस इतकी माझी अपेक्षाच नसते वाईट फक्त वाटतं जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते

मला वाटतं निदान तुला माझ्या कामाची , ते करण्यामागच्या
प्रेमाची जाणीव असावी, थोडी का होईना तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसावी

समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्यानीच मला आनंद मिळत नाही, खरचं का रे तुला माझं  मन कधीच कळत नाही ?
की माझ्या मनापर्यंत पोहचण्या इतका वेळच तुला मिळत नाही .....!

       *-एका पत्नीचं मन*🌹

No comments:

Post a Comment