Monday, 16 January 2017

वामनदादा कर्डक

*वामन तबाजी कर्डक*
जन्म:- १५ ऑगस्ट, इ.स. १९२२
मुळ गाव:- देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू:- 15मे, इ.स. २००४,
राष्ट्रीयत्व :-भारतीय
टोपणनाव:- दादा
नागरिकत्व :- भारतीय
धर्म :- बौद्ध
पत्नी :- शांताबाई वामन कर्डक
अपत्ये :- मीरा (जगु शकली नाही)
दत्तक पुत्र :- रविंद्र कर्डक
वडील :- तबाजी कर्डक
आई :-सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक :- सदाशीव (भाऊ)
सावित्राबाई (धाकटीबहीण)

- वामनदादा कर्डक आपली कविता घेऊन दलितांच्या झोपड्याझोपड्यातून गेले . आपल्या कविता मागची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणतात " मी जेथे जन्मलो, ज्या मातीत वाढलो आणि ज्या अन्यायाखाली भरडला गेलो त्याची मला आठवण आहे. ती कैफियत मी शब्दात मांडतो . त्याला तुम्ही कविता म्हणा किंवा म्हणू नका . मला जे प्रामाणिकपणे जाणवले ते मांडले ". त्यांची बाबासाहेबांच्या विचारावर असीम श्रद्धा आहे . त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे . त्यांनी या दलितांच्या मनात जळजळीत अंगार पेटविला . ते म्हणतात -

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफानवारा पाऊसधारा मूळी न आम्हा शिवे

क्रांतीचे गीते उच्च स्वरात गाणारा वामन कर्डक सारखा कवी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर अस्वस्थ होतो. स्वतंत्र भारतात दलित जमातीवर होणाऱ्या गावोगावच्या अत्याचाराच्या कथा त्यांना सुन्न करतात . त्या अत्याचाराविरुद्ध दलित मन चिडत का नाही , पेटून उठत का नाही त्यामुळे ते खन्तावतात . त्यांच्या मनातले प्रचंड वादळ चित्रित करतांना प्रा . पानतावणे म्हणतात
" भिमरावाच्या समृद्ध मळ्याला आलेली अवकळा पाहून कवी विषण्ण होतो. पोटच्या लेकारागत ज्याला राखला , झारी घेऊन जिथे एकेक रोपावर जलसिंचन केले , तो मळा आता दुहीने पेटलेला आहे . एकीचा जोंधळा आता वाळून चालला आहे . कवीने व्यक्त केलेल्या ह्या भावना संवेद्ण आहेत . भिमापाठी अन्यायाने पुन्हा उसळी मारली आहे . लेकी बहिणींची अब्रू बेदरकारपणे लुटली जात आहे . घरे जाळली जात आहेत . निघ्रून छऴ चाललेला आहे . पण सारेच मूग गिळून बसत आहेत . चिडच नष्ट झाली आहे ." . कर्ड्कांची वेदना कुणालाही जाणवेल . त्यांची कविता म्हणजे त्यांच्या मनात ठसठसत असलेले दुख; त्यांची कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचे आवेग ! ते म्हणतात -

भीम माझ्यामध्ये होता , मान ताठ होती माझी
माझ्यातला भीम इथे , मीच केला उणा , दोष देऊ कुणा

कर्ड्कांच्या कवितेतील हे दुख: बाबासाहेब निधन पावल्यानंतर दलित समाजाला जाणवणाऱ्या पोरकेपणाचे आहे . कर्ड्कांचे कवी मन बाबासाहेबंविषयी कृतद्नेने भरलेले आहे . दादर च्या चैत्य भूमीवर उभे राहतांना ते म्हणतात -

समाधीकडे त्या वाटही वळावी
जिथे आसवांची फुलेही गालावी
जिथे माउलीची चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी .

अशा या महान जळजळत्या कवीला, गीतकाराला , विद्रोह्याला , बंडखोराला त्यांच्या निर्वाणदिना निमित्त सादर नमन

जगातली देखणी गं बाई मी भिमाची लेखनी

जगातली देखणी ……
जगातली देखणी गं बाई मी भिमाची
भिमाची लेखनी गं बाई मी भिमाची लेखनी।

काळ्या मनुचा इमला मी पाडिला,
त्यातच मनुचा मुडदा मी गाडला,
मुडदा मनुचा....
मुडदा मनुचा मीच पाडला रणी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।

ऐर्या गैर्याच्या लेखन्या,
नुसती दिसाया देखण्या,
काळ्या मनाच्या...
काळ्या मनाच्या काळ्या सर्याजनी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।

क्रांतीविराची केली मी चौकशी,
मैत्री भिमाची जडली माझी अशी,
क्रांती भिमाची...
क्रांती भिमाची ठसली माझ्या मनी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी।

साथी रमाचा वामनाचा सारथी,
त्यावर भीमाचे झाले मी भारती,
झालो भिमाच्या...
झालो भिमाच्या झालो दोघीजणी
गं बाई मी भिमाची भिमाची लेखनी ।
    वामनदादा कर्डक

माऊलीची माया होता माझा भिमराया

चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....

चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....

झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया.....

वामनदादा कर्डक

काल भीमाच्या क्रांतीचे
काल भीमाच्या क्रांतीचे
तुम्हीच बारा वाजविले || धृ ||

काल आम्ही लढनारांनी
कडे कडे चढनारांनी
बंड भीमाचे गाजविले || १ ||

अशाच साऱ्या बाळांनी
बाळांनी चांडाळांनी
नपुसकांनी लाजविले || २ ||

वामन वाणी लुटनार्यांनी
गली गलीच्या कुत्रांनी
भांडण सारे माजविले || ३ ||

- वामनदादा कर्डक.

भीमरायाच्या मुला
भीमरायाच्या मुला
तुडवाया टपले तुला,
वैराण रानच्या फुला
ही जाण असु दे तुला
रे भीमरायाच्या मुला.

भवताली वस्ती मधील,
जन आले मस्तीमधी
ते नडती आपुल्या भुला रे....

त्या उजाड माळावरी
कुणी काळी करनी करी
वन जळे आजुबाजूला रे....

सांगणे भीमाचे तुला,
सांभाळ तुझ्या घरकुला
सांभाळ प्राण आपुला रे....

लाडक्या भीमाच्या मुला
वामनच्या फुलत्या फुला
घे तळ हाताचा झुला रे....

वामनदादा कर्डक


उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती
अंधार दूर तो पळे -भीमा तुझ्या जन्मामुळे

जखड बंद पायातील साखळदंड
तटा तटा तुटले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे -भीमा तुझ्या जन्मामुळे

कुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज
अमृताची आली फळे -भीमा तुझ्या जन्मामुळे

धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक
ज्ञानदाता झाला आज रावास रंक
पंखी सुगंध दरवळे -भीमा तुझ्या जन्मामुळे!!!

वामनदादा कर्डक

गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा

कानाची कवाडं इथल्या उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रान्ती येथे घडलीच नाही

आघाडीस होता जरी नऊ कोटींचा राजा
उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा

दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा

दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा

तळे बंद होते कोठे नदी बंद होती
कारण खलांची सारी पिढी अंध होती

अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा
उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा

राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे
वामनास थोडी त्याची चव चाखवा रे

बोलले पुजारी जा धेडग्यानो जा जा
उघडालाच नाही काळ्या रामाचा दरवाजा
     
       वामनदादा कर्डक

दीनांच्या चाकरीसाठी

भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.

उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.

निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.

भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.

तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.

लोकशाहीर वामनदादा कर्डक

महाकवी वामनदादा कर्डक लिहीतात...............
अन्यायाची चिरा चाम्बडी, करा चिंधड्या,
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या..

गावामधले पिसाळलेले गुंड गीधाडापरी,
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी..
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या

बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्ळनार्याला चिरीत जावे वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या..

आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणातल्या उड्या...

अन्यायाची चिरा चाम्बडी, करा चिंधड्या,
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या..
       महाकवी वामन दादा

मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा
मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा,
सांगा दोष देऊ कुणा
आहे तेच माझे गांव आणि तेच गांवकर
माझा भिम असताना कापायचे थरथर,
गेला गेला भिमराणा,
आला नेभळटपणा
दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा,
क्रुर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी,
भिम माझ्या मधी होता मान ताठ होती माझी,
आज माझ्यातला भिम इथ मीच केला उणा,
दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा.
वामनदादा कर्डक

महाकवी वामनदादा कर्डक :-
अन्यायाची चिरा चाम्बडी,चिरा करा चिंधड्या
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या
गावामधले पिसाडलेले गुंड गीधालापारी
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या
बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्लनाराला चिरीत जावी वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या
आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणआतल्या उड्या

नदीच्या पल्हाड बाई , झाडी लई दाट
नदीच्या पल्हाड बाई , झाडी लई दाट
तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट
ओलांडता झाडी , लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळझुळ पाट

राही बारमाही मळा मामाचा हिरवा
तापल्या जीवाला तिथ मिळतो गारवा
पुरवितो पाणी उभ्या पिकला रहाट

उतरतो शीण मुल मामाची पाहून
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेरची ओढी लागे होताच पाहत

जाता जरा पुढे लागे भीमाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धान्यापारी ताठ उभी जोन्धाल्याची ताट .....

- वामनदादा कर्डक

असा भीम होता...
उपाशी जगाचा पसा भीम होता
असा भीम होता, असा भीम होता.

नव्या माणसाचे नवे भक्त सारे
उफाळून उठले नवे रक्त सारे
अशा माणसांच्या नसा भीम होता.

गुलामी जगाची झुगारत होता
पुढे हात सारे उगारत होता
अशा काळजाचा ठसा भीम होता.
वामनदादा कर्डक.

जरी संकटाची काळरात होती
जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.

पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती
.
काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....

गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.

मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती

- वामनदादा कर्डक -

पाणी वाढ ग
पाणी वाढ ग
लयी नाही मागत भर माझ
इवलंस गाडग , पाणी वाढ ग,

काळान केल काळ
जातीच विणल जाळ
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतंय माझ बाळ
पाज आम्हाला पाणी
अन मग डोळे फाड ग ......

गाईला हिरवा चारा
जळणाचा लाकूडफाटा
मी आणून देईन सारा
करील सार काम तुझ मी
झाडील वाडग ......

साऱ्यांच्या पडल्या पाया
आली ना कुणाला माया
पाण्याच्या थेंबासाठी
तळमळते माझी काया
कर्माचा ना धर्माचा
एक पोहरा वाढ ग ...........

- महाकवी वामनदादा कर्डक

लोकशाहीर वामनदादा कर्डक :-

भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.

उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.

निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.

भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.

तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.

लेखणी भीमाची लेखणीच होती
लेखणी भीमाची लेखणीच होती
कारण खरी ती लेखणीच होती ||

घातकी रुढीची शीर छेडणारी
गौतमचा भाला फेकनीच होती ।।

गरिबाची ओझे शिरी फेकतांना
लेखणी भीमाची टेकनीच होती ।।

मनूच्या मनावर मेख ठोकणारी
लेखणी भीमाची लेखणीच होती ।।

वामन तुम्हाला हिवा गारट्याची
शेकुटी प्रमाणे शेकुटीच होती ।।

-महाकवी वामनदादा कर्डक

महाकवी वामनदादा कर्डक :-

अन्यायाची चिरा चाम्बडी,चिरा करा चिंधड्या
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या

गावामधले पिसाडलेले गुंड गीधालापारी
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या

बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्लनाराला चिरीत जावी वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या

आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणआतल्या उड्या

सांगा आम्हाला
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?

घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?

न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?

लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?

इथबिऱ्‍हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?

इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?

शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?

महाकवी वामनदादा कर्डक

बाबासाहेबांना उद्देशून वामनदादा लिहितात .....

समाधीकडे त्या वाट हि वळावी
तिथे आसवांची फुले हि गळावी ,

जिथे माउलीचे चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी ,

लाविता समाधी समाधी समोरी
दशा या जीवाची आईला कळावी ,

पाहण्या सदा त्या मुख माउलिचे
तिथे थोडी जागा मला हि मिळावी ,

वामन मला तू जाळशील जेव्हा
समाधी पुढे त्या चिता हि जळावी .

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.

गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्‍याचे दुसरेच टोक असते.

तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.

सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.

वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते.

- वामनदादा कर्डक.

भीम माझा कसा होता...

काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता
लेकराला जशी माता , भीम माझा तसा होता !

झुंज देऊन काळाशी , सात कोटी गुलामांचा
उंचविला इथे माथा , भीम माझा असा होता !

रास लावून ज्ञानाची , वाटली ती गरिबांना
पहिला ना कधी जो , तो पामराला पसा होता !

कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने
दान केला ह्या देशाला , ज्ञान साठा असा होता !

वाट खर्चास जाताना , गौतमाच्या निवासाला
दिला काढून कमरेचा , बांधलेला कसा होता !

अंतःकरणाच्या पाटीवर , दीनदुबळ्या समाजाच्या
युगे युगे राहील , तो भीम माझा ठसा होता !

काय सांगू तुला वामन , भीम माझा कसा होता
सात ठिगळांच्या बंडीचा , भीम माझा खिसा होता !

कवी- वामनदादा कर्डक.

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.

हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.

हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्यावाऱ्‍याने मावळणारी जात आमुची नव्हे.

तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.

काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.

एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.

जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.

- वामनदादा कर्डक

महाकवी वामनदादा कर्डक -

वागने बाई नीट नाही भरताराची
आईच्या घराची याद येई माहेराची || धृ ||

पति माला फटकेच देई
सासु बिचारी चट्केच देई
जाचणी जीवाला तीच नंदना , दिराची || १ ||

पहाटी उठावे , दळावे मळाव
कस बस शेताला पळाव
खणाची रताळी मीच , काळ्या वावराची || २ ||

घरी मी कराव , दारी मी कराव
कराव तरी मी उपाशी मराव
कुणा कीव नाही माझ्या अश्रूंच्या धारांची || 3 ||

पोटाला पुरेशी पेज तरी वामन
असावी सुखाची रोज तरी वामन
पाहतोच होळी तूच माझ्या संसाराची || ४ ||

भीम जयंती आली
पहाट झाली प्रभा म्हणाली , भीम जयंती आली
चांदाची चांदणी येउन खाली
वारा भीमाला घाली ,

सफेद साडीवर , सफेद कांचोळी
लेऊन आली ग गगनाची भोळी
ओवाळाया भीम सख्याला, उतावळी ती झाली ,

करी घरी कुणी पुरणाची पोळी
गीत कुणी ओठी भीमाचे घोळी
फोटोपाशी बसून कोणी , म्हणे मिळाला वाली ,

असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी
घुसळून देणारा तत्वाचे लोणी
असेच त्याचे गीत घुमावे , निळ्या आभाळा खाली ,

एका तुतारीने जागविले कोटी
एका ध्वजाखाली वागविले कोटी
मानवतेचा दूत असावा असाच वैभवशाली ,
.
जमेल जनसागर ऐकाया गाण
चल उठ बिगी वामन तुला तिथे जाण
तुलाच झाली सांज सकाळी निळ्या मखमली

स्तूप

जेथे समाज सारा हा एकरूप आहे,
तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे.

वादात रंगते ना, रंगून भंगते ना
नेत्रूत्व ते अम्हाला तीर्थस्वरूप आहे.

द्वेषाचा दर्प नाही, तो काळसर्प नाही
सत्कारणी क्रूतीचा जेथे हुरूप आहे.

तनमनाने धनाने, जळतो धिमेपणाने
मानू तयास आम्ही तो भीमरूप आहे..

21 comments:

  1. Great poem about reality of our society.
    Great writer of social welfare

    ReplyDelete
  2. दादा चां संग्रह उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  3. अप्रतिम कविता

    ReplyDelete
  4. स्वाभिमानी जय भिम

    ReplyDelete
  5. जय भीम.... विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  6. उपलब्ध करुन दिल्याबद्दल, धन्यवाद

    ReplyDelete
  7. वामानास त्याच्यापरी कुणी लाभला नाही..
    आम्हास वामानापरी दुसरा कुणी नाही..

    ReplyDelete
  8. अशा या महान जळजळत्या कवीला, गीतकाराला सादर नमन

    ReplyDelete
  9. mahya pendyala shalat ghala hi waman dada chi kavita aslyas krupaya 7875416351 ya whats app no. var share kar

    ReplyDelete
  10. आले विहारी मी आले तुझ्यासाठी
    वाहनांची लेखणी मी झाले तुझ्यासाठी

    ReplyDelete
  11. धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल.....

    ReplyDelete
  12. असा कवी आणि विचारवंत होणे नाही

    ReplyDelete
  13. मला वामन दादांच्या चरणी बसून त्यांना ऐकण्याची संधी मिळाली.मी माझ्या भीमाला पाहिले नाही.परंतू वामनदादांनी आम्हाला भीम त्यांच्या गायनातून आणि लेखणीतून दाखवला.दादा माझ्या अनेक पिढ्या आपले उपकार विसरणे अशक्य आहे.दादांना विनम्रपणे अभिवादन !!
    आणि आपले आभार

    ReplyDelete
  14. आपल्या अनेक पिढ्या यांच्या ऋणी राहतील!

    ReplyDelete
  15. धन्यवाद दादा, विचाराचा झरा उघडा केल्याबद्दल

    ReplyDelete